सिंचन विहिरींच्या कामासाठी 35 कोटी उपलब्ध करुन द्या पालकमंत्र्यांचे रोहयो मंत्र्यांना पत्र.. अपूर्ण विहीरी पूर्ण करणार….

सिंचन विहिरींच्या कामासाठी 35 कोटी उपलब्ध करुन द्या
पालकमंत्र्यांचे रोहयो मंत्र्यांना पत्र..
अपूर्ण विहीरी पूर्ण करणार….
वर्धा, (जिमाका), दि.7 :-शेतक-यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हयाला 2 हजार विहीरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या विहीरीपैकी अपूर्ण व अर्धवट असलेल्या तसेच पूढील हंगामात हाती घ्याववयाच्या विहीर बांधकामासाठी 35 कोटी 18 लक्ष रुपये तातडीने उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुनील केदार यांनी रोजगार हमी योजना मंत्री संदिपनराव भुमरे यांना पत्राव्दारे केली आहे.
जिल्हयाला 2 हजार विहीरीचे लक्षांक देण्यात आले होते. मंजूर लक्षांकानुसार पंचायत समितींना निधी वाटप करण्यात आला. वाटप केलेला पूर्ण निधी संपला असून कामे सुरु असलेल्या विहिरीसाठी निधीची आवश्यकता आहे. मंजूर विहिरीपैकी 732 लाभार्थ्यांनी विहिरींची कामे सुरु केली आहे. यापैकी 330 विहीरी पूर्ण झाल्या आहे. उर्वरीत विहीरींचे बांधकाम अपूर्ण आहे. अनुदानाची रक्कम न मिळाल्याने लाभधारक आर्थिक अडचणीत सापडलेले आहे.
यावर्षी पूर्ण झालेल्या व बांधकाम अर्धवट असलेल्या विहीरींसह पुढील हंगामात हाती घ्यावयाच्या 1 हजार 268 विहीरीसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. वर्धा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तसेच जिल्हयाचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी तातडीने 35 कोटी 18 लाख रुपयाचा निधी उपलब्घ होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी रोजगार हमी योजना मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे. तसेच समक्ष बोलवूनही त्यांनी निधीसाठी आग्रही भूमिका मांडली आहे.