राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन दि.१५ मार्च पर्यंत प्रवेशिका आमंत्रित

राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
दि.१५ मार्च पर्यंत प्रवेशिका आमंत्रित
वर्धा, दि. 23 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यांनी दि. 15 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे.
‘माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य’ हा सर्व स्पर्धांचा विषय आहे. पाच प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. त्यात प्रश्न मंजुषा स्पर्धा, व्हिडिओ मेकींग स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना voter-contest@eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेशिका सादर करावयाच्या आहे.
सदर स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येतील. त्यात हौशी गट, व्यावसायिक गट व संस्थात्मक गटाचा समावेश आहे. तीनही गटांमध्ये वेगवेगळी रोख पारितोषिके, भारत निवडणूक आयोगाचे नाव असणाऱ्या वस्तू व ई-प्रमाणपत्र दिले जातील. हौशी गटात गायक, व्हिडिओ मेकींग, भित्तीचित्र याचा केवळ छंद असलेली व्यक्ती सहभागी होऊ शकतील.
व्यावसायिक गटात गायन, व्हिडिओ मेकींग आणि भित्तिचित्र या बाबींमध्ये व्यावसायिक दृष्टीने काम करणाऱ्या व्यक्ती सहभागी होऊ शकेल. संस्थात्मक गटात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा शिक्षणसंस्था आणि केंद व राज्य शासनाच्या नोंदणीकृत संस्थांमधील व्यक्ती, विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
स्पर्धेची अधिक माहिती ecisveep.nic.in/contest या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत वर्धा येथे देखिल माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे निवडणुक उपजिल्हाधिकारी यांनी केळविले आहे. दि.15 मार्च पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करावयाच्या आहेत.