जिल्ह्यात बोगस बियाणे आढळल्यास कारवाई करा पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश खरीप हंगामपुर्व आढावा बैठक

जिल्ह्यात बोगस बियाणे आढळल्यास कारवाई करा
पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश
खरीप हंगामपुर्व आढावा बैठक
वर्धा, दि. 12 (जिमाका) : बोगस बियाण्यांमुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे असे बियाणे विक्री होत असल्याचे आढळल्यास सबंधितांसह बियाणे कंपनीच्या वरीष्ट अधिका-यांवर कार्यवाही करा. तसेच शेतक-यांनी सुध्दा बियाणे प्रमाणित आणि अधिकृत असल्याची खात्री करुन पावतीसह बियाणे खरेदी करावे, असे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात खरीप हंगामपुर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्र्यांसह खा. रामदास तडस, आ. रणजित काबंळे, आ. दादाराव केचे, आ. समिर कुणावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतक-यांनी बियाणे किंवा कोणत्याही कृषि निविष्ठा खरेदी केल्यास खरेदीची पावती घेतली पाहिजे. विक्रेत्यांनी प्रमाणित आणि अधिकृतच निविष्ठांची विक्री करावी. कृषि सेवा केंद्राचे स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी बैठकीत केल्या. शेतक-यांना त्यांच्या जमिनीत कोणती पिके घेणे अधिक सोईचे आहे. हे ठरविण्यासाठी माती परिक्षण करणे आवश्यक असते. शेतक-यांना नजीकच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक बाजार समितीच्या ठिकाणी माती परिक्षण सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले असून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांनी कर्जवाटप, खते, बियाणे व इतर कृषि निविष्ठाचा पुरवठा, विज जोडण्या, सिंचन आदींचाही आढावा घेतला. यावेळी आ. रणजित काबंळे यांनी प्रलंबित विज जोडण्या तातडीने देण्यात याव्या तसेच बोगस बियाणे विक्री होत असल्यास सबंधितांवर कारवाई करण्याची सुचना केली. आ. कुणावार यांनी बोगस बियाणे आढळल्यास बियाणे कंपनीच्या संचालकांवर कारवाई करण्यात यावी. अशी सूचना केली. आ. दादाराव केचे यांनी भाऊसाहेब फुंडकर यांनी फळबाग योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचा मुद्दा उपस्थित केला.
पिक कर्जासंबंधी तालुका स्तरावर तक्रार पेटी
शेतक-यांना वेळीच पिक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या पिक कर्जाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक कार्याल्यात तक्रार पेटी ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या पेटीत शेतक-यांनी सादर केलेल्या तक्रारी उपनिबंधक स्वत: बघून त्यावर कारवाई करतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
30 मे पर्यंत पाणी टंचाई कामे करा
पाणी टंचाईची कामे तीन टप्प्यात केली जातात. टंचाईची शक्यता असणा-या गावांमध्ये वेळीच कामे होणे आवश्यक आहे. आराखडयात घेण्यात आलेल्या सर्व कामांना मंजूरी देऊन 30 मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करा. असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
लोकसहभागातून 8 प्रकल्पातील गाळ काढणार
पूर्ण येथील ग्रीन थंम्ब या संस्थेच्या वतीने पूणे शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला या धरणातील गाळ लोकसहभागातून काढला याच धर्तीवर जिल्हयातील आठ प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यात येणार आहे. ग्रीण थम्ब या संस्थेचे कर्नल सुरेश पाटील यांनी लोकसहभागातील या उपक्रमाची यावेळी माहिती दिली.