जिल्ह्यात 12 हजार शेतकऱ्यांना कृषि पंपासाठी वीज जोडणी 752 शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ उच्चदाब वितरण प्रणालींतर्गत 1794 जोडण्या

जिल्ह्यात 12 हजार शेतकऱ्यांना कृषि पंपासाठी वीज जोडणी
752 शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ
उच्चदाब वितरण प्रणालींतर्गत 1794 जोडण्या
वर्धा, (जिमाका) : सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या विहीरींवरील कृषि पंपास वीज जोडणी असणे अत्यंत आवश्यक आहे. मागेल त्या शेतकऱ्यास वीज जोडणी देण्याचे शासनाचे धोरण असून यानुसारच मागील पाच वर्षात जिल्ह्यातील तब्बल 12 हजार 669 शेतकऱ्यांना कृषि पंपास वीज जोडणी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेती बहुतांश पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ खरीपातील मुख्य पिक घेतात. शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त पिके घेतली पाहिजे, पर्यायाने त्यांचे कृषि उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी त्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. विविध योजनेतून शेतकऱ्यांना विहिर बांधकामाचा देखील लाभ दिला जातो. शासकीय योजनांसह शेतकऱ्यांना स्वखर्चातून बांधलेल्या विहीरींना वीज जोडणी दिली जाते.
मागील सन 1016-17 यावर्षापासून सन 2020-21 या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर वीज जोडणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामुळे 12 हजार 669 शेतकऱ्यांना कृषि पंपांना विद्युत कनेक्शन मिळाले आहे. मागील पाच वर्षात वर्धा तालुक्यातील 1 हजार 423 शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली. सेलू तालुका 826 जोडण्या, देवळी तालुका 1 हजार 667 जोडण्या, आर्वी तालुका 1 हजार 883 जोडण्या, आष्टी तालुका 1 हजार 303 जोडण्या, कारंजा तालुका 1 हजार 125 जोडण्या, हिंगणघाट तालुका 2 हजार 329 जोडण्या तर समुद्रपुर तालुक्यातील 2 हजार 113 शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहे.
उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत देखील या व्यतिरिक्त 1 हजार 794 शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात आले आहे. काही कारणास्तव कृषि पंपांना वीज जोडणी देणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांना जोडणी देता यावी यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना सुरु केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना अनुदान सुध्दा दिले जाते. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सौर पंपासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 753 शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 752 शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आला असून उर्वरीत एका पंपाचे काम अंती टप्प्यात आहे.