शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम- ब योजनेचा लाभ घ्यावा…महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत. राज्यातील कृषी पंप वीज जोडणीसाठी सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण्याची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना सुरु करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम- ब योजनेचा लाभ घ्यावा
वर्धा, दि.17(जिमाका) : महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्यावतीने (महाऊर्जा) राज्यातील कृषी पंप वीज जोडणीसाठी सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण्याची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत शेतक-यांना 50 हजार सौर कृषी पंप देण्यात येण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांनी या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आहे आहे. योजनेअंतर्गत राज्यात पारेषण विरहित सौर कृषि पंपाची आस्थापना करण्यात येणार असून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होईल. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्या पेक्षा जास्त क्षमतेचे सौरपंप उपलब्ध होणार आहे. यासाठी सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याना कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसुचित जाती किंवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के स्वहिंस्सा भरावा लागणार आहे.
शेततळे, विहीर, बोरवेल, बारामाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील, शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी, पारंपारिक वीज जोडणी उपलब्ध नसणारे शेतकरी, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापी मंजूर न झालेले अर्जदार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील. योजनेचा लाभ घेण्याकरीता सविस्तर माहिती साठी व ऑनलाईन नोंदणीसाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर भेट द्यावी अथवा जिल्हा कार्यालय,वर्धा 32/14 लाहूनजी नगर, सेंट अॅंथनी शाळा समोर,पोस्ट ऑफिस जवळ, जेल रोड वर्धा येथे संपर्क साधावा, असे महाऊर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.
0000