आर्वी / वर्धा जिला की ख़बर
भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक रोवर व ईटीएस मशिनचे प्रशिक्षण

-
भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक रोवर व ईटीएस मशिनचे प्रशिक्षण
- वर्धा, दि.21 (जिमाका) : जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाच्यावतीने भूमिअभिलेखच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय मोजणी संबंधी रोवर व ईटीएस या अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण सेवाग्राम येथील हेलिपॅड ग्राऊंड येथे पार पडले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख प्रमोद ठुबे, वर्धा येथील उप अधीक्षक प्रसन्ना भुजाडे, आष्टी येथील उप अधीक्षक मिलिंद भोळे, कारंजा येथील उप अधीक्षक अरविंद सांभारे व आर्वी येथील उप अधीक्षक भिमराव नान्ने यांच्या भूमि अभिलेख विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणास LEICA या कंपनीच्यावतीने त्यांचे प्रशिक्षक अनिरुद्ध कपुर यांच्यद्वारे रोवर व ETS मशिनची माहिती देण्यात आली. मशिनच्यामाहितीसह संबंधित उपकरणे हाताळणी व मोजणी कामात या उपकरणांचे होणारे उपयोग याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
सदर उपकरणांच्या उपयोगामुळे जिल्ह्यातील मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने व अधीक अचुकतेने होण्यास मदत होणार आहे. रोवर या उपकरणाद्वारे थेट उपग्रहाशी जोडल्या जाऊन जिवो रेफरन्सिंगद्वारे मोजणी होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या जमीनी तसेच शहरी भागातील मालमत्तांबाबत नागरिकांच्या मालमत्तांची मोजणीबाबतची समस्या तातडीने व अचुकतेने निपटारा होण्यास मदत होणार आहे.
सदरच्या प्रशिक्षणास भूमिअभिलेख विभागाचे वर्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील एकूण 35 कर्मचारी सहभागी झाले होते. अत्याधुनिक मशिनद्वारे मोजणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण सेवाग्राम येथील हेलिपॅड ग्राऊंड येथे तर माहेश्वरी भवन येथे इतर माहितीचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाला बजरंग पवार, समिर बावने, सम्राट काबंळे, दुर्गेश कुळकर्णी, मनीष तंबाखे आदी कर्मचारी उपस्थित होते.
0000000