आर्वी / वर्धा जिला की ख़बर

महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारण्याचे प्रयत्न यशस्वीतेकडे -देवेंद्र फडणवीस * चरखागृह येथे ध्वजारोहण, संविधान प्रास्ताविकेचे अनावरण * स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत
साकारण्याचे प्रयत्न यशस्वीतेकडे
-देवेंद्र फडणवीस
* चरखागृह येथे ध्वजारोहण, संविधान प्रास्ताविकेचे अनावरण
* स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

वर्धा, दि. 12 (जिमाका): महात्मा गांधी यांनी मांडलेली देशाच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात झाली असून बापूंना अपेक्षित असलेले समाजाच्या शेवटच्या घटकाच्या जीवनातील परिवर्तनही दिसून येत आहे. या प्रयत्नांमध्ये समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. चरखागृह येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, सरपंच सुनिता ढवळे यावेळी उपस्थित होत्या.
महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या कर्मभूमीचा विचार संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक असून या विचारानुसार देशात सर्व घटकांच्या समतोल विकासासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी तीन कोटी घरे, सहा कोटी घरांना स्वच्छ पिण्याचे पाणी, अडीच कोटी घरांना वीज जोडणी, पाच कोटी कुटुंबांना घरगुती गॅस जोडणी देण्यात आली आहे. तसेच महात्मा गांधींच्या संकल्पनेतील भारतीय मुल्ये जोपासणारी शिक्षण पद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन शिक्षा नीती तयार करण्यात आली असून प्रादेशिक भाषेत सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधींच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून आयातीवर निर्बंध घालून स्वदेशीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. अनेक महत्वाच्या उत्पादनांची निर्यात भारतातून होत आहे, असे गौरवाने सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपली जबाबदारीही समजून घेणे आवश्यक आहे. आपला अभिमान, स्वाभिमान असलेल्या तिरंगा झेंड्याचा सन्मान वाढविण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वसामांन्यांचा उत्सव व्हावा. यासाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी होवून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आपण सर्वांनी 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळून विभाजन काळात आपल्या देशबांधवांनी भोगलेल्या हाल-अपेष्टा आणि केलेला त्याग जाणून घ्यावा. त्यातून आपल्याला देशाच्या अखंडतेचे महत्व कळेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महोत्सव काळात प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर निर्मितीचा संकल्प नरेंद्र मोदी यांनी केला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 पेक्षा अधिक सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहेत. सेवाग्राम येथील तलावाचा समावेशही जिल्हा प्रशासनाने यामध्ये करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा गौरव करताना आदिवासी, रामोशी, बेरड समाजातील अनाम स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे श्री. फडणवीस म्हणाले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. महात्मा गांधीनी अनेक वर्षे सेवाग्राम येथे वास्तव्य केले. त्यांची ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. गोरगरिबांना घरे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज आणि घरगुती गॅस जोडणी देवून त्यांचा विकास साधला जात आहे, असे खासदार श्री. तडस म्हणाले.
महात्मा गांधींमुळे सेवाग्रामला जगभर ओळख मिळाली. या परिसरातील कामांसाठी 266 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाला गती मिळाली. तसेच येथील प्रलंबित कामे, प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार डॉ. भोयर यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.
जिल्हाधिकारी श्रीमती देशभ्रतार यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गुड गव्हर्नन्स’ अंतर्गत ई-चावडी, डिजिटल नकाशे, डिजिटल सातबारा योजनेसह, स्वामित्व योजना, उज्ज्वल भारत योजना, अमृत सरोवर योजनेची कामे सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.
स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबियांचा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना ध्वज वितरण करण्यात आले. आयएसओ मानांकन प्राप्त केल्याप्रकरणी हिंगणघाट उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भूमी अभिलेख कार्यालयाला जमीन मोजणीसाठी ‘रोव्हर’ हे मोजणी यंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. हर घर जल योजनेंतर्गत नळजोडणी पूर्ण केलेल्या खापरी ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत दोन शेतकरी उत्पादक गटांना अर्थसहाय्य धनादेश वितरीत करण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘हर घर तिरंगा’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. यामध्ये वर्धाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती भगत यांनी केले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओम्बासे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते चरखागृह परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यांनी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या शिल्पांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. चरखागृहामध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास चित्र स्वरुपात मांडण्यात आला आहे.


*****

Related Articles

Back to top button
Close
Close