75 नदी परिक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थांची बैठक

75 नदी परिक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थांची बैठक
वर्धा, दि.13 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील 75 नद्यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील धाम नदीचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत नदीच्या कामासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत निसर्ग हिल्स येथे सामाजिक संघटनांची नुकतीच बैठक पार पडली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुनील रहाने, सृजनचे संस्थापक अध्यक्ष श्री.भरत, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सद्भावना संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भगत, पत्रकार प्रशांत देशमुख, सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे उपस्थित होते.
राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. वर्धा येथेच या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यात जिल्ह्यातील धाम नदीचा समावेश असल्याने या नदीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यासाठी सेवाग्राम आश्रम परिसरात जलनायक, जलयोद्धा, जलसेवक व पाणी या विषयावर काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच या नदीच्या मोहिमेचा शुभारंभ होणार असून त्याची पुर्वतयारी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने 75 नदी परिक्रमा हा उपक्रम राबवावयाचा आहे. यासाठी संस्थांना लागणारे सर्व सहकार्य जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येईल, असे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत त्यांनी उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन देखील केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.घुगे यांनी देखील नदी ही स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे याबाबत मार्गदर्शक केले.
सभेच्या आयोजनामागील भूमिका श्री.बेलखोडे यांनी मांडली. श्री.भरत यांनी लोकसहभागातून या अभियानातील विविध कामे कशी सहजपणे करता येईल, याची सविस्तर माहिती दिली. श्री.राठी यांनी धाम नदीच्या तिरावरील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मिलिंद भगत व नेहरू युवा केंद्राचे सतीश इंगोले यांनी उद्घाटन प्रसंगी कलश व त्याचे पुजन, बॅनर आदींची जबाबदारी स्विकारली. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000