महाज्योतीच्या टॅब वितरण योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ – रामदास तडस, विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण , समता पर्व अभियानाचा उपक्रम

महाज्योतीच्या टॅब वितरण योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ
– रामदास तडस
विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण
समता पर्व अभियानाचा उपक्रम
वर्धा, दि. 28 (जिमाका) : शासनाच्या निःशुल्क टॅब वितरण योजनेमुळे गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे सुलभ होईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज येथे केले.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर व समाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे आयोजित केलेल्या समारंभात खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना निःशुल्क टॅबचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. पंकज भोयर, सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य चंदू पोपटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळण्यासाठी JEE/NEET/MHT-CET,MPSC,UPSC परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण महाज्योती मार्फत देण्यात येते. अकरावी करीता विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या व 10 वीला किमान 65 टक्के गुण असलेल्या इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सदर योजना आहे. केंद्र सरकाराने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा, तसेच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या निःशुल्क टॅब वितरण योजनेचा लाभ घेऊन शिक्षणात प्रगती करावी, तसेच वर्धा जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचवावे, असे आवाहन खासदार तडस यांनी यावेळी केले.
आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले की, कोरोना नंतरच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे महत्व वाढले आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महागडे टॅब घेणे शक्य होत नव्हते, ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे शासनाने लगेच पाऊले उचलून विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क टॅब वितरण योजना सुरू केली. त्यामुळेच आज आपण विद्यार्थ्यांना टॅब देऊ शकत आहे. ही महत्वपुर्ण योजना सुरू केल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शासनाने दिलेल्या या टॅबचे योग्य वापर करून शिक्षणात प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
000000