शिक्षणामध्ये यशाचे शिखर गाठण्याचे बळ प्राप्त करून देण्याची ताकद- राहुल कर्डिले……. निपुन भारत अभियानांतर्गत सुलभकांची कार्यशाळा

शिक्षणामध्ये यशाचे शिखर गाठण्याचे बळ प्राप्त करून देण्याची ताकद- राहुल कर्डिलेØ….
निपुन भारत अभियानांतर्गत सुलभकांची कार्यशाळा
वर्धा, दि.26 (जिमाका) : अध्ययन परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या संदर्भात मर्यादीत उद्दिष्ट न बाळगता त्यांना स्वत:च्या गतीने शिकण्याची व संपुर्ण क्षमतांचा वापर करण्याची संधी प्राप्त करून द्यावी. ज्ञान व कौशल्याने समृध्द होऊन यशाचे सर्वोच्च शिखर गाठण्याचे बळ प्राप्त करून देण्याची ताकद केवळ शिक्षणामध्ये आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
निपुन भारत अभियानांतर्गत सुलभकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॅा.मंगेश घोगरे, निपुन भारत अभियानच्या जिल्हा समन्वयक डॅा.नितु गावंडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, लिंबाजी सोनवणे, तज्ञ सुलभक म्हणून नागपूर येथील डॅा.शिल्पा सुर्यवंशी, यवतमाळ येथील हर्षदा चोपने, गजानन तुरारे, शंकर केमेकार उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.घुगे यांच्या संकल्पनेतून जिप शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षणाला भेट दिल्यानंतर श्री.घुगे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणेने स्वत:ला अद्ययावत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या दृष्टीकोनात बदल करून नवीन अध्ययन अध्यापन तंत्रांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील आठ याप्रमाणे एकून 64 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा विकास व्हावा, जिज्ञासू वृत्तीला चालना मिळावी, चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी सोबतच शिक्षकांमध्ये सहकार्यातून अध्ययन करण्याचे नवीन कौशल्य विकसित व्हावे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता रत्नमाला खडके, मंजुषा औढेकर, अधिव्याख्याता डॅा.अपर्णा शंखदरवार, प्रतिभा देशपांडे, मधुमती सांगळे, दीपाली वासोळे, साधनव्यक्ती गजानन वैद्य यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेच्या घटकसंचांची निर्मिती करणारे शिक्षण परिषदेचे राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे यांनी देखील प्रशिक्षणास भेट देऊन मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्ह्यातील केंद्र प्रमुख, विषय साधनव्यक्ती, विशेष साधनव्यक्ती, शिक्षकांचा समावेश होता.
00000000